नवी दिल्ली- केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान द्यावे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान करावे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची धुरा द्यावी, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला आहे. भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेवरच फोकस करावा, असेही गौतम यांनी सुचवले असून, त्यांच्या या भूमिकेवरून भाजपअंतर्गत खळबळ उडाली आहे. संघप्रिय गौतम यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात ही भूमिका मांडली आहे. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांत मोठे नेते आहेत; पण २०१९ मध्ये मोदी लाट येण्याबाबत शंका असल्याचे गौतम यांनी म्हटले आहे.
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मोदी मंत्र पुन्हा काम करण्याची शक्यता
कमीच आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हे मान्य आहे. मात्र, ते बोलू शकत नाहीत. केंद्र सरकारच्या
धोरणांविरोधात जनतेत असंतोष पसरला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, जर आता निवडणुका झाल्या तर भाजप काही
राज्य वगळता सर्व ठिकाणांहून सत्तेबाहेर जाईल, असा इशारा त्यांनी
दिला. योजना आयोगाचे नाव बदलणे, सीबीआय, आरबीआयच्या कार्यात सरकारचा हस्तक्षेप
होत असल्याचे सांगत गौतम यांनी, उत्तर प्रदेशचे
विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धार्मिक कार्यास पाठवले पाहिजे, अशी सूचना केली आहे.